तक्रारींच्या जलद निवारणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना; ‘संवेदना’ पोर्टलद्वारे होणार कार्यवाहीचा आढावा
परभणी, दि. ८ ऑक्टोबर २०२६ : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी गुरुवारी परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यातील एकूण १७ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य
नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या तक्रारींचे जलद निवारण करणे आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
परभणी जिल्ह्याच्या कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी श्री. उमाप सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. याचदरम्यान दुपारी ३ ते ४.३० या वेळेत त्यांनी तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मालमत्ता वाद, मारहाण आणि तपासासंबंधी तक्रारी
जनसंवादादरम्यान प्राप्त झालेल्या १७ अर्जांमध्ये मालमत्तेसंबंधी वाद, मारहाणीच्या घटना, दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच अवैध व्यवसायांशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. या तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘संवेदना’ पोर्टलद्वारे तक्रारींचा पाठपुरावा
तक्रारदारांच्या अर्जांवर प्रभावी कार्यवाही व्हावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना’ तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. जनसंवादातून प्राप्त सर्व अर्ज या पोर्टलद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे पुढील चौकशी आणि कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.
या वेळी परभणीचे पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

